Loading...
र. नं. अ. ७९० (क) ता. नांदुरा , जि. बुलडाणा ४४३१०१
+91 7020955685

आई निंबाईची पोथी ।

श्री गणेशाय नम : । श्री गुरुभ्यो नमः । पहिले नमन निंबामातेस ।
निंबोळ्याच्या निंबादेवीस । येथे भक्त करिती निवास । मातेच्या मंदिरा कारणे ॥ १ ॥

श्री क्षेत्र निंबादेवी निंबोळा संस्थान । पुरातन जागृत देवस्थान ।
येथे महासरस्वती , महालक्ष्मी , 1 महाकालीचा निवास | येथे वास करितसे । निंबादेवी ॥ २ ॥

साक्षात वैष्णोदेवीची प्रतिकृती । भक्तांना अमरनाथाची आठवण देती ।
दुःखितांचे दुःख हरती । अशी ही महान निंबामाता ॥ ३ ॥

येथे तीन पवित्र नद्या असती । त्यास त्रिवेणी संगम म्हणती ।
विश्वगंगा , कमळजा आणि सरस्वती । अशी त्यांची नावे हो ॥ ४ ॥

या पवित्र नदयातील स्नानाने । सर्व पाप नाश करणे ।
मृतात्म्यास शांती देणे । संगम हा त्रिवेणीचा ॥ ५ ॥

ही भूमी सकल भक्तांच्या उद्धाराची । विश्वगंगा , कमळजा आणि सरस्वती नदयांची ।
धार्मिक व शास्त्रीय कारणांची । महिमा तर संगमाचा ॥ ६ ॥

तुकडोजींचे रक्षा विसर्जन । संगमावरील जल देवी चरणावरून ।
वाहत जाती कुंडावरून । पुढे मिळती महासरस्वतीला ॥ ७ ॥

तीन नंदयांच्या संगमाची कथा | अभ्यंग स्नानाने दर होते व्यथा ।
जो मनापासून गातो गाथा । त्याचे दुःख दारिद्र्य दूर होई ॥ ८ ॥

हा निंबादेवीचा महिमा असे । येथे सर्व देवीदेवता वसे ।
भक्तवत्सलांची श्रद्धा दिसे । रुप पालटे दुःखाचे सुखात ॥ ९ ॥

या आध्यात्मिक ठिकाणी । ठरे अंधश्रद्धा निकामी ।
जया भक्ती असेल अंतकरणी ॥ तयांना दर्शन देत असे महालक्ष्मी ॥ १० ॥

येथे चौसष्ट शिखर योगिनी । त्यास जागृत शक्तिपिठ म्हणूनी ।
ती महामंगल कारिणी । करिती विश्वाचे कल्याण ॥ ११॥

ती माया ममतेचा सागर । ती आम्हा भक्तांचा आगर ।
या शक्तिपिठाचा महिमा थोर । कुणी न राहे दुःखी कधी ॥ १२ ॥

येथे प्रसन्न होई मन । घेता निंबादेवीचे दर्शन ।
मन येथे होई रममान । निघण्यास पाय तयार नसे ॥ १३ ॥

या हेमाडपंथी मंदिरात | भक्त नवसे करितात ।
नवस होई पूर्णप्रत । येता पौर्णिमा अमावस ॥ १४ ॥

येथे पूर्व वाहिनी संगम लाभला । भारतातील दुसरे तिर्थक्षेत्र म्हणती तिजला ।
तीन देवींच्या तीन मूर्तीला । वसे किर्ती बाणरुपात ॥ १५ ॥

येथील सरस्वती नदीचा । गोमुखातून उदय झाला ।
तिर्थक्षेत्र तिर्थपानाचा । देई रोगीजनांना जीवनदान ॥ १६ ॥

तीन नद्या तीन देवींचे प्रतीक । त्यांचा इतिहास मी सांगू कितीक ।
सभोवताली मनोहारी परिसर रम्यक । आगमन होता निर्जनस्थळी ॥ १७ ॥

प्रणवरुपिनी मनमोहिनी । नवसास पावते म्हणूनी ।
निंबामातेची ही कहाणी । गात असे अवनीवरती ॥ १८ ॥

बांधकाम यादवकालीन 11 मंदिराचे । अशा या थोर निंबामातेचे ।
शतश : करू या प्रणाम त्यांचे । निंबोळ्यातील निंबाई मातेस ॥ १९ ॥

कुणी भद्रकाली म्हणती तिजला । कुणी म्हणती कल्याणी ।
अतिसौभ्य रूप बघूनी | आम्ही येतो तवचरणी । माते मस्तक टेकविते ॥ २० ॥

आगम निगम तुझा विचार । तुझ्या पायी येताच मिळतो आधार |
पौर्णिमेच्या दिवसाचे तुझे महत्व फार । म्हणूनी गर्दी पौर्णिमेला ॥ २१ ॥

याच संगमावर काळा पाषाण । त्यावर तीन पिंडी स्वयंभू कोरून |
शंकरजी शेजारी नंदीचे वाहन । त्या पिंडीतच वसतसे नंदी ॥ २२ ॥

घेण्या ज्योर्तिलिंग दर्शन । त्याच ओढीने येती सज्जन ।
मंदीर फार पुरातन । ती पींड भगवान शंकराची ॥ २३ ॥

जिथे पिंडीचे दर्शन होते । मन प्रसन्न होते ।
दुःख कष्ट पिढा नाश होते । लिला भगवान शंकराची ॥ २४ ॥

हा भाग दंडकारण्यी । श्रीराम प्रभुंनी स्पर्शनी ।
पतीत पावन म्हणूनी । हर्षीत झाला नभोवन ॥ २५ ॥

अदृश्य रुपाने वसती देवादीक । पाहती भक्तांची श्रद्धा मनोभाविक ।
होतो हर्ष सदोदीक । गाभ्यातील टेकडीवर ॥ २६ ॥

येथे संत नागबाबांचे | आहे समाधी मंदिर । उत्तरगडास घोगलवाडी शिवार ।
उंच विशाल टेकडीवर। महावीर हनुमान वसतसे ॥ २७ ॥

अनेकांना झालाय साक्षात्कार। हा तर म्हणे भक्तीचा चमत्कार।
पूर्व तीरावरील संगमावर। बालक दासजी महाराजांचा आश्रम असे ॥ २८ ॥

हे एक निसर्गरम्य स्थळ । वड, पिंपळ, वनराईचातळ ।
हा उंच वाटतसे गड । सर्व देवालये दिसतीडोळा भरून ॥ २९ ॥

संगमाचा दक्षिणगड । तिथेनिंबादेवी मंदिरवड |
अप्रतिम डोंगरगड । असेमहान वारसा ॥ ३० ॥

म्हणे गाथा लिंगनाथन | बेल फुलाने करावे पुजन |
धन्य होई तनमन | पूर्ण होई मनोकामना ॥ 31 ॥

गोमुखाच्या पूर्वबाजूस । भुयारी मार्ग मिळतो पाहावयास |
जिथे संपे भुयाराचा प्रवास | तेथे वसे संत कमळनाथ ॥ 32 ॥

एकदाचा प्रसंग जाहला । भुयारातूनी विस बकऱ्या सोडल्या ।
केवळ एक बकरी मिळाली पाहावयाला । अशी होती भुयारी मार्गाची महती ॥ ३३ ॥

भुयारांचा एक असा इतिहास | जुलूम अन्यायाचा जेव्हा होता त्रास ।
तेव्हा मूर्त्यांच्या रक्षणास । होता भुयारी मार्ग बनविला ॥ ३४ ॥

गोमुखाच्या वायव्यदिशेला | स्थापन केले म्हसोबाला ।
नसे मारक विज्ञानाला | या श्रद्धाभावनेसमोर ॥ ३५ ॥

राजे शिवछत्रपतींनी । स्वातंत्र्य स्थापने कारणी |
निंबाईच्या आशिर्वादानी | केला प्रवासारंभ ॥ ३६ ॥

जर करावयाची शत्रूवर स्वारी । वा जावयाचे आजोळी |
जात निंबाईच्या द्वारी । परती विजयी होऊन ॥ ३७ ॥

या शक्तिपिठाचा महिमा । आधार देतो भक्तांना ।
गाती गोड भजनांना | ओढ मातेच्या दर्शनाची ॥ ३८ ॥

अश्विन शुद्ध अष्टमीला । नवचंडी महायज्ञ जाहला ।
नवरात्रीच्या शुभ मुहूर्ताला । मोठा उत्सव भरतो ॥ ३९ ॥

उत्सवाच्या मंगलदिनी । प्रचंड गर्दी नभोवनी ।
दर्शन घेण्या कारणी । जनसमुदाय येतो ॥ ४० ॥

पुराण काळातील वारस्याचा । प्रभूरामचंद्राच्या चरणस्पर्शाचा ।
आशीष देतो भक्तांचा । कष्ट निवारण्याला ॥ ४१ ॥

प्रभू रामचंद्र गेले वनवासी । सोडून त्या अयोध्येशी ।
अपहरण केले माता सीतेसी । नवरात्र अनुष्ठान आयोजिले ॥ ४२ ॥

रामचंद्राना मिळाले वरदान । त्या योगे कार्य आले घडून ।
रावनाचा विनाश करून परतले प्रभू रामचंद्र ॥ ४३ ॥

महाभारतातील एक महान कथा । ती पांडवाच्या विनाशाची व्यथा ।
दूर करण्या भगवंतानी । दुर्गापूजेचा उपदेश केला | ॥ ४४ ॥

पांडवांनी केले दुर्गापूजन केले देवीचे आराधन ।
खास दिधला एक मंत्र । होई मनोरथ सकलांचे ॥ ४५ ॥

पुजा अर्चनेनंतर जोडूनी दोन्ही कर !
म्हणावे ॐ हिम क्लिम निम्बाय विच्छे । ॐ हिम क्लिम अंबाये विच्छे ॥ ४६ ॥

ज्याने मन शांत होते । ज्याने सुख समृद्धी नांदते ।
मनोरथ पूर्ण होते । सकल जनांचे ॥ ४७ ॥

सप्तशतीच्या पाठाचा महिमा खास । फलदायी जिवनाची आस ।
पूर्तीसाठी होतात नवस । पूर्ण होवो मनोकामना ॥ ४८ ॥

कुणी आजाराने कंटाळे | कुणी आत्म्यास विटाळे |
दारिद्र्याने कुणी गांजले । तेव्हा उपासणा होते देवींची ॥ ४९ ॥

लोक करी नवस । होतो कष्टाचा विनाश ।
सुखाचा पडतो पाऊस । देवी भावाची भुकेली ॥ ५० ॥

मनापासूनी देवीला कुणी काही मागे । भक्तांसाठी ती धावे वेगे वेगे ।
भक्तसंकटी पडता तिला चिंता लागे । दूर करी अन्यायाला ॥ ५१ ॥

भक्ती असावी खरी । मनापासूनी अंतरी ।
दुःख कष्ट निवारी । तारेल भक्तांला ॥५२॥

जेव्हा जेव्हा माता क्रोधीत होते । पापी दृष्टांचा संहार करते ।
अन्यायाला दूर सारते । न्यायाचा दाखवी प्रकाश ॥ ५३ ॥

जरी न सोसवे भक्तांची पिढा | मनात घाली तिच्या वेढा ।
न घेता आढावेढा । जावे पवित्र दर्शनास ॥ ५४ ॥

म्हणत असे बाबा पुजारी । ऐकियली निंबाईची कथा सारी ।
अनेकांनी कथियली मंदिरी । सापडती दृष्टांत ॥ ५५ ॥

असेल कोणी अनाथ वा पोरके । कुणी गांजियले बनले कोडके ।
पुत्रप्राप्तीसाठी माता झुरते । निंबाई पिढा दूर करी ॥ ५६ ॥

निर्धनास दिले धन । मुलबाळांनी बनला परिसर धन्य ।
गरिबांची भागवून भूक तहान । बरे केले रोग्यांना ॥ ५७ ॥

असे केले अनेक चमत्कार | देवीचे अनेक उपकार ।
संदेश देई परोपकार थोर त्या निंबाईची गाथा ॥ ५८ ॥

चैत्रशुद्ध प्रतिपदेला | गुढीपाडव्याच्या सणाला ।
मान वाढतो यात्रेला । लहानथोर यात्रेस जाती ॥ ५९ ॥

पाहती मातेचा सोहळा । कडेवर घेई बाळा |
रात्री असो वा दिवसाला | गर्दा राहे चारोप्रहर ॥ ६० ॥

येथे मातीच्या मडक्याची नवलाई । पुढे दर्शन घ्यावे आसरा आई !
फुलते सारी वनराई । बाळांना सुखरूप ठेविते ठेविते ॥ ६१ ॥

निंबाईच्या त्रिवेणी संगमात । पवित्र स्नानाने निरोगी जिवनात |
घरातही तिर्थ शिंपडतात । दूर होती कटकटी ॥ ६२ ॥

येथे नांदतो अष्टभैरव । या भूमीचा आणिक गौरव |
नवनाथांनी केला यज्ञ भव्य । जगाचे तारण केले कष्टातूनी ॥ ६३ ॥

असे हे थोर अनुभव | संकटातून तारले मानव ।
देवीचे चरणी असावा भाव । पावतसे भक्ताला ॥ ६४ ॥

सप्तशतीचा पाठ खास । असे मंदिरात पठणास होई संकटमोचन |
लाभे शांती मनास । करावे सप्तशती पठण ॥ ६५ ॥

येथे दिसती प्राचीन पिंपळ वृक्ष | त्याचे नाव अश्वरथवृक्ष |
मुळाशी ठेवून कुस । निद्रा घेई भगवानकृष्ण ॥ ६६ ॥

देई जशी शितल छाया । तसेच पुजण पुत्र रक्षण्या ।
द्वारी राहे पिंपळ या । असा महिमा पिंपळाचा ॥ ६७ ॥

हजारो भाविक येती । अन्नदाता फलदान करती ।
आशीर्वाद देवींचा घेती । पुरी करण्यामनोकामना ॥ ६८ ॥

संगमावरील शिवलिंगाला | पुजती शिवरात्री, सोमवार, सोमवती अमावस्येला ।
गर्दी असे दर्शनाला भाविक भक्तांची ॥ ६९ ॥

शिवलिंगाचा असा अगाध महिमा । गोपूरतिर्थ दिले नामा |
भजती सकल जनस्थळा | लिंग दिसे शिवांचे ॥ ७० ॥

निंबोळा पवित्र देवस्थान । ऐतिहासिक दृष्ट्या महान ।
किर्ती गाण्यास पडे मी लहान । कृपादृष्टी देवींची ॥ ७१ ॥

वारसा श्रीराम पांडव, छत्रपतींचा | गौरव असे देवस्थानाचा ।
केवळ मान दर्शनाचा । रुप पाहावे डोळा भरून ॥ ७२ ॥

निसर्गाचा चमत्कार । डोंगर दऱ्या अपरंपार ।
त्यात वसे देवीचे मंदिर | जय हो माता निंबाई ॥ ७३ ॥

अगाध महिमा देवींचा । असा शब्दात कसा वर्णावयाचा ।
ठेवा मिळे देवीकडून शब्दांचा | अर्पण निंबाई चरणी ॥ ७४ ॥

आशीष असू दे भक्तांवर । शेवटी मी असे पामर ।
महिमा अगाध कसा वर्णनार । कमी पडे वर्णन करण्या ॥ ७५ ॥

असे आम्हा सर्वांचे कुलदैवत थोर । निंबाईची कृपा आम्हावर ।
बरसो कृपादृष्टी सकलांवर । हेच मागतो वरदान ॥ ७६ ॥

करतो तुला शतदा नमन । दे आशीर्वाद मन भरून ।
सुखावून जाई जनमन । मनोरथाची पूर्ती होई ॥ ७७ ॥

जय आई निंबाई माते । दर्शनाने मन धन्य होते ।
लाभो कृपा सदैव माते । निंबाई कथा संपूर्णम् ॥ ७८ ॥

॥ जय देवी आई निंबाई ॥